Tuesday, 3 July 2012

उमलण्याआधी खुडल्या जातात येथे कळ्या......

उमलण्याआधी खुडल्या जातात येथे कळ्या......


सत्यमेव जयते या सिनेनट आमिर खानच्या कार्यक्रमामुळे कधी नव्हे एवढी ’धार’ सामाजिक समस्यांना आली आहे.
समाजातील पितळ उघडे पडलेल्या वर्गाने आमिर खान च्या व्यक्तिगत चारित्र्यावर हल्ला चढवत स्वत:चे गुन्हे ’छोटे’ दर्शवण्याचा हतबल प्रयत्न करुन पाहिला. अर्थात जनमानस एवढे खुळे राहिलेले नाही किंवा ’हा कार्यक्रम आम्ही पाहतो व आमिर खानच्या मताशी पूर्णपणे सहमत आहोत, आम्ही आधुनिक विचारांचे असुन अश्या विषयांवर संवेदनशील आहो’ असे सांगणे हा काहींसाठी ’प्रेस्टीज इश्यु’ आहे. त्यामुळे या ’फिजूल’ च्या गोष्टींना ’उघड’ महत्व काही मिळालेले दिसून येत नाही.
’स्त्री भ्रुण हत्या’ हा या कार्यक्रमातला एक ज्वलंत इश्यु...अतिशय मेहनत घेऊन ह्या  कार्यक्रमाचा प्रत्येक भाग सादर केला गेला असल्याने तितकाच परिणाम कारक तो ठरला. समाजातील सर्वच थरांवर याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि सरकार दरबारी दबाव वाढला. संबधित कायदे पारित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला.
उच्च तंत्रज्ञानाचा अविष्कार खरतर मानवाच्या विकासासाठी प्रगतीसाठी झालेला आहे व केला जावा असा संकेत आहे. पण माणुस आपल्या स्वार्थापोटी कोणत्याही थराला जाउ शकतो
विशेष म्हणजे राज्य सरकारांनीही या समस्येला कारणीभूत डॉक्टर, सोनोग्राफी सेंटर्स यांच्याभोवती पाश आवळायला सुरुवात केली.
आमिर खान च्या प्रसिध्दी वलयामुळे या समस्येला ’स्टार व्हॅल्यु’ आधिच मिळालेले असल्याने मिडियाने याचा फायदा उचलत या संदर्भातील बातम्यांचा पाठपुरावा केला.
महाराष्ट्रातील परळीतील सुदाम मुंडे व सरस्वती मुंडे या पेशाने डॉक्टर असलेल्या जोडप्याने केवळ पैश्यांच्या लोभाने हजारो कळ्या जन्माला येण्या आधी खुडल्या. माणुसकीला काळिमा फासणा-या या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला. संस्कृतीचे गोडवे गाणा-या समाजाला ही एक सणसणीत चपराक होती. यापुर्वी ही अश्या प्रकारच्या घटना राजरोसपणे घडत होत्याच, राजकिय वरदहस्त, पैश्यांच्या जोरावर संबंधितांचे तोंडही बंद केले जात होते, पण या वेळी ’वलयांकित’ झाल्यामुळे मुंडे, सानप इ. डॉक्टरांवर आरोग्यविभागाने इतके दिवस दाखवलेली अनास्था दूर करुन कठोर कारवाईचा बडगा उगारला. मुंडे दांपत्याला पळता भुई थोडी केली..अखेर हे ’खुनी’ दांपत्य कायद्यापुढे शरण आले. कायद्याने त्यांना शिक्षा होईल ती होईलच किंवा पुन्हा पैश्यांच्या व राजकिय वरदहस्तांच्या जोरावर ही मंडळी उजळ माथ्याने समाजात वावरतीलही सकृतदर्शनी ही सर्व मशिनरी दोषी असल्याचे पुरावे मिळत आहेत...त्यांचा अपराध हा मोठाच नाही तर अतिअमानवीय आहे...कोर्ट शिक्षा देण्याआधि कित्येंक सह्र्द्य मनातुन त्यांना आतापर्यंत कितीदा ’फाशी’ दिली गेली असेल...
उच्च तंत्रज्ञानाचा अविष्कार खरतर मानवाच्या विकासासाठी प्रगतीसाठी झालेला आहे व केला जावा असा संकेत आहे. पण माणुस आपल्या स्वार्थापोटी कोणत्याही थराला जाऊ शकतो
आणि म्हणुनच समाजातील स्त्रीभ्रुण तपासणी आणि हत्या करण्यासाठी या अश्या डॉक्टरांकडे स्वत:च्या पत्नीस, सुनेस, मुलीस घेऊन जाणा-या महाभागांचे काय?
त्यांची पापे काय कमी आहेत, त्यांच्यावर कारवाई होण्याचे चान्सेस कमी असले तरीही....
स्वत:च्या पोटच्या बाळाला ती एक मुलगी आहे म्हणुन नाकारणारे पालक, ज्यांच्यामुळे हे प्रकार वाढले, फोफावले त्यांच काय?
’मुलाला’ जन्म देण्यासाठीच शरीरसंबंध जोडणारे हे कोणत्या सजीव प्रकारांत मोडतात?
ते सुध्दा या प्रकाराला तितकेच  जबाबदार आहे नाहीत का...नव्हे जास्त मोठा गुन्हा त्यांचाच तर आहे.

स्त्री-पुरुषाने एकत्र येण्याचं, कुटुंबसंस्था विकसित होण्याचं मुख्य प्रयोजन त्यांच्या शारीरिक गरजा समाजमान्यतेने, सनदशीर मार्गाने पूर्ण करणे एवढेच नसून,  पुढची पिढी घडविणे, त्यासाठी योग्य कौटुंबिक पार्श्वभूमी तयार करणे, जबाबदारी वाटून घेणे, मुलांच्या निकोप वाढीसाठी कुटुंबात आपांपसांत प्रेम, विश्वास, साहचर्य वाढवणे असे आहे.
मूल जन्माला घालताना जोडप्याला नक्कीच माहिती असते की जन्माला येणारं मूल हे मुलगा किंवा मुलगी असणार मग यानंतर सोनोग्राफी करुन मुलगा आहे की मुलगी हे तपासण्याचं खर तर कारण नसतच..पण इथचं समाजाची स्वार्थी मानसिकता आडवी येते. मुलगा म्हातारपणी सांभाळणार ( हा पराकोटीचा स्वार्थ ...खर तर मुलगा हवा असण्याचे हे मुख्य कारण आज निरर्थक ठरत आहे पण तरीही मोठ्या आशेने मुलाची आशा प्रत्येक जोडपे बाळगते.) एकदा मुलगा झाला की सुटलो ( पुन्हा पराकोटीच्या स्वार्थाची  इच्छा म्हणजे मुलींना जन्म ज्याला हुंडा देण्याची ऐपत आहे त्यांनी द्यावा आम्हांला काय आमची म्हातारपणाची चिंता मिटली ) आमची सांपत्तीक स्थिती मुलीला हुंडा देण्याइतपत नाही ( खरतर कायद्याने हुंडा देणे/घेणे अवैध आहे ) या पासुन ही तपासणीची कारणे सुरु होतात तर अगदी सासुला-सास-यांना मुलगाच हवा..मुलगी आवडत नाही या सारख्या कारणांमुळे या गर्भलिंग तपासण्या केल्या जातात. या तपासण्या करण्याला खरतर स्त्री विरोध करु शकते...नवरा विरोध करु शकतो...अगदी ज्याला या बद्दल माहिती आहे असे नातेवाईकही हा विरोध करुन यांस रोखु शकतात, पण समाजाची मला काय त्याचे? अशी स्वार्थाकडे झुकणारी मानसिकता असं काही रोखणे दूर उलट या गोष्टींना उत्तेजनच देत असते.
हे गर्भलिंग साधारणपणे ज्या कालावधीत समजू शकते त्या वेळपर्यंत पोटातील बाळाची बरीचशी वाढ झालेली असते..
आणि त्यानंतर हा गर्भ काढून टाकल्यामुळे मातेच्या प्रकृतीवर ही विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. ब-याच मातांचे मृत्युही झालेले आहेत.
अश्या गर्भपातांनंतर या गर्भांचे काय केले जाते हे पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही. भावना असते ती फक्त मोकळं झाल्याची खुशी.
हा अमानुषपणा का केला जात आहे? जर मूल नको तर किती तरी उपाय असताना मुलगा होण्यासाठी...
मुलगा होई पर्यंत अश्या प्रकारे मुलींचा गर्भ खुडणे हा त्या स्त्री-पुरुषाचा/ पति-पत्नीचा अमानुषपणांच नाही का?
जे आप्त आपल्या घरात या प्रकारांना विरोध करत नाहीत ते यांत सामील आहेत..असं का समजु नये?
कोण आहेत हे अमानवीय लोक जे मानवी समाजाला चुड लावण्याचे काम समाजात उजळ माथ्याने राहुन करत आहेत?
आपली आई, बहिण या स्त्रिया असूनही, स्वत: एक स्त्री असून पुरुषांना-स्त्रियांना मुलींचा गर्भ खुडण्याची ही अघोरी बुध्दी का होतं असते?
त्या साठी ते बेकायदेशीर वागतात, स्वत:चा जीव पणाला लावतात. अश्या डॉक्टरांचे खिसे भरतात... हा त्यांचा अपराध नाही का?
समाजातले स्त्रीयांचे प्रमाण कमी होत असुन पुढे मुलांना लग्न करण्यासाठी मुली मिळणार नाही... ज्या मुली असतील त्यांना समाजात धोका निर्माण होईल...
बालिकांना, मुली-महिलांना अश्या परिस्थितीत घराबाहेर पडणे मुश्किल होईल..सामाजिक असमतोल निर्माण होईल...
लैंगिक समस्यांचा आगडोंब उसळेल हा विचार त्यांना छळत नाही का?
समाजमान्यतेच्या नावाखाली स्वत:चा व्यक्तिगत स्वार्थ किती दिवस साधणार आहेत हे
एक मुलगी जेंव्हा घरात जन्म घेते ते सुख, ते आनंदाचे क्षण खरंतरं कसे असते हे त्यांना अनुभवायचेच नसते का?
हल्ली तर मुलगी मुलगा यांत फरकही राहिलेला नाही...मुलांची सर्व क्षेत्रे मुलींनीही समर्थपणे काबिज केली आहेत...
मुलीही त्यांच्या पालकांची मुलासारखीच काळजी घेताना दिसतात.
मग तरीही का असतात ते इतके करंटे की या सुखाला लाथाडून मोकळे होतात?
का नाही विरोध करत...या असल्या अमानुषतेला...
आज सुदाम मुंडे सारख्या डॉक्टरांबद्दल आपण बोलतो तेंव्हा त्यांचा गुन्हा मोठा आहे कबूल..पण त्यांना दोष देउन समाजघटक म्हणुन आपली जबाबदारी संपते का?
समाजघटक म्हणुन काही जबाबदा-या आपल्या नाहीत का?
हे जग बदलण्यासाठी, ते सुंदर करण्यासाठी आधी स्वत:पासून सुरुवात करायल हवी आहे
'कायदा महत्त्वाचा आहेच. पण त्याहून महत्त्वाचं आहे ते बदल घडवणं...आपण ह्या बदलासाठी तयार आहोत ना...
हुंड्यासारख्या घातक समाजप्रथेमुळे सर्वाधिक स्त्रीभ्रुण हत्या होताहेत म्हणुन हुंडा देणा-या व घेणा-यांविरुध्द कडक भूमिका आपण घेणार आहोत ना....
आपल्या घरात, आजुबाजुला अश्या घटना होतात किंवा होउ पाहतात तेंव्हा कायदयाची उपलब्ध मदत आपण घ्यायला हवी आहे ना....
आज समाजाला स्त्रीभ्रुण हत्ये सारख्या अतिशय संवेदनशील विषयावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे या साठी आपल्याला जनमत तयार करता येऊ शकते ना....
तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता ना...बहिणी ला जीव लावता ना....तुमची पत्नी-सहचारिणी तुम्हांला प्रिय आहे ना...मग मुलगीच का नको....
भावी समाजाला आई, बहिण, सहचारिणी हव्या आहेत...म्हणुन ’मुली’ या हव्यातच
मग का नाही आपण एक जबाबदार नागरिक म्हणुन स्त्री भ्रुण हत्ये विरोधासाठी कृतीशील चळवळ उभारण्यासाठी तयार होत....

2 comments:

 1. Replies
  1. प्राजक्ता..
   उशिर झाला उत्तर द्यायला....
   पण तरीही खुप धन्यवाद...

   छाया थोरात

   Delete